स्पर्धात्मक परीक्षांची तयारी: यशाची पंचसूत्री

 In Maharashtra times

आज प्रत्येकाला करीअर बनवण्याकरिता स्पर्धेला सामोरे जावे लागते . वैद्यकीय क्षेत्र असो, इंजिनीरिंग असो, सैन्यातील करीअर असो वा यूपीएससी, एमपीएससी, एसएससी, बॅंकिंग परीक्षांच्या माध्यमातून उपलब्ध असणाऱ्या असंख्य करीअरच्या संधी असोत, प्रत्येक क्षेत्रात आज स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यावाचून आपल्याला पर्याय नाही. स्पर्धा परीक्षांचा जो बाऊ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडून, विशेष करून मराठवाड्यातील ग्रामीण भागातील विदयार्थ्यांकडून केला जातो तो चुकीचा आहे आणि काही प्रयत्नांतून त्यावर मात केली जावू शकते. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी अफाट बुद्धीमत्तेचीच गरज लागते असे नाही तर त्या त्या परीक्षेसाठी लागणारे तंत्र आत्मसात केले की यश हमखास मिळते आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते यश लवकरात लवकर मिळते, त्यासाठी गरज असते ती फक्त आत्मविश्वासाची,  आपल्या ध्येयासाठी पूर्णतः झोकून देण्याची आणि योग्य मार्गदर्शनाखाली मार्गाक्रमण करण्याची! ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या माध्यमातून सुरु केल्या जाणाऱ्या या साप्ताहिक स्पर्धा लेखमालेतून आपण विविध स्पर्धात्मक परीक्षा आणि त्यात यशस्वी होण्यासाठी लागणारे मार्गदर्शन यांचा अंतर्भाव करणार आहोत.

कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होण्यासाठी लागणारे यशाचे सूत्र म्हणजे      ‘ 5 P सूत्र ’.  सर्वात पहिले यशाचे सूत्र म्हणजे ‘PURPOSE’. तुमचे ध्येय पक्के असेल आणि त्या ध्येयासाठी तुम्ही संपूर्णतः पेटलेले असाल तर तुम्ही तुमची संपूर्ण एनर्जी तुमच्या लक्ष्यावर केंद्रित करू शकता. ह्या पहिल्या सूत्रावर तुम्ही पक्के असाल तर जगातली कुठलीच शक्ती तुम्हाला तुमच्या ध्येयापासून फार काळ दूर ठेवू शकत नाही. पाउलो कोहीलो यांनी त्यांच्या ‘ द अलकेमिस्ट’ या पुस्तकांत म्हटलेलेच आहे की, जेव्हा आपण आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा संपूर्ण विश्व ते साध्य करण्यासाठी एकत्र येते. यशाचे दुसरे सूत्र म्हणजे ‘POSITIVE ATTITUDE.’ स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करताना तुम्हाला असंख्य अडचणी येतील, पण आपल्या ध्येयाला डोळ्यासमोर ठेवून आणि नेमके कशासाठी आपल्याला यशस्वी व्हायचे आहे, हा विचार मनात ठेवून पूर्णतः सकारात्मक दृष्टीकोन ठेवला की यश हमखास मिळते. लांब पल्ल्याच्या धावपटूने धावण्याच्या पहिलेच जर असा विचार केला की एवढे मोठे ४२ कि.मी. चे अंतर मी कसे पार करणार, तर तो आयुष्यात कधीच ती स्पर्धा पूर्ण करू शकणार नाही , जिंकण्याची तर बातच सोडा! म्हणून सकारात्मक दृष्टीकोन ठेवून अविरतप्रयत्न करत राहणे हे खूप आवश्यक आहे. यशाचे तिसरे सूत्र म्हणजे ‘PRACTICE.’ खऱ्या अर्थाने लिहिण्याचा, बहुपर्यायी प्रश्न परीक्षेच्या वातावरणात सोडविण्याचा सराव, सराव आणि सराव हाच खरा स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचा मंत्र आहे. परीक्षेचा, प्रश्नांचा बारकावा लक्षात घेवून त्या दिशेने भरपूर सराव करणे ही यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे. यशाचे चौथे सूत्र म्हणजे ‘PERSEVERENCE.’ जो व्यक्ती हिम्मत न सोडता यश मिळेपर्यन्त झगडत राहतो आणि ध्येयापासून लक्ष विचलित न होवू देता स्वतःवर संयम ठेवतो तोच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात यशस्वी होतो. यशाचे पाचवे आणि शेवटचे सूत्र  सूत्र म्हणजे ‘POLITENESS.’ प्रयत्नाअंती यश मिळवणे हे तितके कठीण नाही , परंतु ते टिकवून ठेवणे ही सर्वात अवघड बाब आहे. स्पर्धात्मक परीक्षांमधून उत्तीर्ण होवून अधिकारी बनणे हा करीअरमधला महत्त्वाचा टप्पा जरी असला तरी खरी कसोटी ही त्यानंतरच असते. आपले पाय जमिनीवर ठेवून, जनसामान्यांसाठी जो अधिकारी कार्य करतो तोच खऱ्या अर्थाने एका लोकसेवकाच्या भूमिकेत यशस्वी होतो आणि समाजामध्ये शासकीय सेवेच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटवितो. आयुष्याच्या या टप्प्यामध्ये विनम्रता हा गुणधर्म सर्वात महत्त्वाचा ठरतो.

यशाची ही पंचसूत्री फक्त स्पर्धात्मक परीक्षांमध्येच यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे असे नाही तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात ही लागू पडते. आत्मविश्वास, आपल्या ध्येयाप्रती स्वतःला पूर्णपणे झोकून देणे, योग्य मार्गदर्शनाखाली आपला स्वतःचा यशाचा मार्ग शोधून त्यावर मार्गाक्रमण करणे, यश मिळेपर्यंत विचलीत न होता झगडत राहणे आणि यश मिळविल्यानंतर देखील विनम्रता ठेवून त्याचा समाजासाठी उपयोग करणे हेच चिरकालीन यशाचे खरे रहस्य आहे. तर मग वाट कशाची बघताय , चला पहिले पाऊल ठेवू या आपण आपल्या यशाच्या मार्गावर…

‘ Arise! Awake! And stop not until the goal is reached..’

(क्रमशः)

(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत.)

स्पर्धात्मक परीक्षेत यशासाठी इंग्रजीची भिती घालवास्पर्धात्मक परीक्षेत यशासाठी इंग्रजीची भिती घालवा