सैन्यदलातील डॉक्टरचे ‘हटके’ करीअर

 In ZEE MARATHI DISHA

सर्वसामान्य लोकांच्या मनात सैन्यदलातील सेवेविषयी बरेच समज आणि गैरसमज असतात. बरेच जण असं मानतात की, सैन्यदलातील नोकरी म्हणजे – केवळ गोळीबार, केवळ हिंसाचार आणि सैन्यदल म्हणजे केवळ लढण्यासाठी आवश्यक असणारं सैन्यदल ! परंतु हा समज पूर्णतः चुकीचा असून सैन्यदलातील करीअर म्हणजे भारतात उपलब्ध असणाऱ्या उत्कृष्ट करीअर संधींपैकी एक महत्वाचा करीअरचा पर्याय आहे. सैन्यदलातील अधिकारी पद हे केवळ लढाऊ शाखांमध्ये उपलब्ध नसून – डॉक्टर, इंजिनीअर, वकील यांसारख्या तज्ञ मंडळींना देखील सैन्यदलात अधिकारी बनण्याच्या अफाट संधी उपलब्ध असतात. एखादया व्यक्तीला त्याच्या आयुष्यात रुग्णसेवेची संधी मिळणे आणि त्याचबरोबर देशासाठी स्वतःला समर्पित करण्याची संधी मिळणे म्हणजे त्या व्यक्तीचं अहोभाग्यच मानायला हवं ! सैन्यदलात डॉक्टर बनून आपण आपल्या देशासाठी या माध्यमातून अतिशय महत्वाचं कार्य करू शकता.

भारतीय सैन्यदलात आर्मी मेडीकल कोअर नावाची एक महत्वाची शाखा कार्यरत आहे. युवकांसोबतच युवतींनादेखील आर्मी मेडीकल कोअर शाखेमध्ये सैन्यदलातील अधिकारी म्हणून कार्य करण्याची उत्कृष्ट संधी उपलब्ध आहे. सैन्यदलात आर्मी मेडीकल कोअर शाखेतून अधिकारी बनण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. बारावीनंतर NEET प्रवेश परीक्षेच्या आणि AFMC प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारावर पात्र युवकांना AFMC महाविदयालय, पुणे येथून MBBS ची पदवी धारण करता येते आणि इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर त्या उमेदवाराची सैन्यदलात कॅप्टन पदावर नेमणूक होते. AFMC शिवाय भारतातील कुठल्याही वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS ची पदवी प्राप्त केल्यानंतर देखील पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादेपर्यंत कुठलाही MBBS डॉक्टर आर्मी मेडीकल कोअर शाखेमध्ये अंशकालीन अथवा कायमस्वरूपी सेवेसाठी पात्र ठरतो. नुकतीच आर्मी मेडीकल कोअरमध्ये १५० डॉक्टरांची अंशकालीन सेवेसाठी नियुक्ती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून पात्र डॉक्टरांसोबतच इंटर्नशिप करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील ही संधी उपलब्ध आहे.

संरक्षण मंत्रालयाद्वारे घोषित जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांना मुलाखत चाचणी आणि त्यानंतर खडतर सैन्यप्रशिक्षणाचा टप्पा पार पाडावा लागतो आणि त्यानंतर त्या उमेदवाराची सैन्यदलातील कॅप्टन या पदावर नेमणूक होते. आर्मी मेडीकल कोअर ही सैन्यदलातील एकुलती एक शाखा आहे ज्यामध्ये अधिकारी पदावरील नियुक्तीमध्ये सुरुवातीच्या ‘लेफ्टनंट’ या पदावर नेमणूक न होता ‘कॅप्टन’ या पदावर सुरुवातीलाच नेमणूक होते. पदव्युत्तर MD अथवा MS पात्र उमेदवारांना तसेच MCI मान्यताप्राप्त पदविकाधारकांना महत्तम ४२ महिन्यांपर्यंतची सेवाज्येष्ठता प्राप्त होऊ शकते, जेणेकरून केवळ सहा महिन्यातच अशा उमेदवाराची कॅप्टन पदावरून मेजर या पदावर बढती होऊ शकते. पुरेसा पगार, सैन्यदलातील सोयीसुविधा आणि भारतीय सैन्यदलाचा अविभाज्य घटक असण्याचा अभिमान या बाबी सैन्यदलातील डॉक्टरांना विशेष महत्त्व प्राप्त करून देतात. केवळ सैन्यदलात कार्यरत असतानाच अधिकारी पदाची शान आहे अशातला भाग नाही तर निवृत्तीनंतर देखील सैन्यदलातील डॉक्टरांना खाजगी वैद्यकीय सेवेशिवाय, हॉस्पिटल प्रशासनामध्ये उत्कृष्ट करीअरच्या संधी उपलब्ध असतात.

आर्मी मेडीकल कोअरमधील डॉक्टर सैन्यदलाच्या विविध युनिट तसेच आर्मी टीमचा एक अविभाज्य घटक असतात. आर्मी मेडीकल कोअरमधील डॉक्टर हा प्रथम एक सैनिक म्हणून प्रशिक्षित आणि कार्यरत असतो आणि त्यानंतर त्याचे एक डॉक्टर म्हणून कार्य सुरु होते. प्रत्येक सैनिकाला अपेक्षित असणारे युद्ध-प्रशिक्षण, शारीरिक आणि मानसिक कणखरपणा आणि एक अधिकारी म्हणून अपेक्षित असणारे सारे गुण सैन्यदलातील डॉक्टर अधिकाऱ्यांमध्ये सामावलेले असतात. आर्मी मेडीकल कोअर शाखेतून अधिकारी बनणे म्हणजे केवळ चांगल्या पगाराची आणि समाजात प्रतिष्ठेची नोकरी नसून, व्यक्तिगत आयुष्यात देखील स्वतःचा विकास करण्याची ही एक उत्कृष्ट संधी आहे. वैद्यकीय क्षेत्रात स्वतःचे ज्ञान वाढविणे त्याचबरोबर पदव्युत्तर तसेच सुपरस्पेशालिटी कोर्सेस साठी उत्कृष्ट संधी सैन्यदल आपल्या अधिकाऱ्यांना प्रदान करते. देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय आर्मी मेडीकल कोअरमधील डॉक्टरांनी वेळोवेळी गौरवास्पद कामगिरी केलेली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध मिशनमध्ये भारतीय सैन्यदलातील डॉक्टरांनी अतुलनीय कार्य केलेले आहे. केवळ वैद्यकीय ज्ञानाच्या जंजाळात फसून न राहता आर्मी मेडीकल कोअरमधील डॉक्टरांना आपल्या कलागुणांना विकसित करण्यासाठी, देशसेवेसाठी शौर्य गाजविण्यासाठी, आपत्तीकाळामध्ये पीडितांची सुटका करण्यासाठी अथवा दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सैन्यदलाच्या लढाऊ शाखांसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी – भारतीय सैन्यदल विविध संधी प्रदान करते. सियाचीनमधील अत्युच्च शिखरं असोत वा राजस्थानमधील रणरणतं वाळवंट असो – प्रत्येक रणक्षेत्रात सैन्यदलातील डॉक्टरांनी आपली क्षमता वेळोवेळी सिद्ध केलेली आहे. अफगानिस्तामधील काबुल दह्शतहल्ल्यामधील अतुलनीय शौर्य गाजविणारा आर्मी मेडीकल कोअरचा ‘शौर्य चक्र पुरस्कार विजेता’ शहीद मेजर एल. जे. सिंग हा याचीच प्रचीती देतो.

सैन्यदलातील अधिकारी पदासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी दाखविल्या जाणाऱ्या जाहिरातीमध्ये एक प्रश्न विचारला जातो – ‘Do you have it in you ?’ सैन्यदलात अधिकारी बनणं हे कुण्या येऱ्यागबाळ्याचं काम नाही तर असा युवक ज्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे; विपरित परिस्थितीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द आहे – अशा युवक-युवतींसाठी सैन्यदलातील करीअर ही सर्वोत्कृष्ट संधी आहे. तुम्ही डॉक्टर आहात म्हणजे स्वतःला केवळ खाजगी वैद्यकीय व्यवसायामध्ये बांधून घेणं असा होत नाही तर त्याच्याही पलीकडे जाऊन देशासाठी, समाजासाठी आणि स्वविकासासाठी काहीतरी हटके करण्याची जिद्द आपल्यात असेल तर सैन्यदलातील आर्मी मेडीकल कोअरचे करीअर आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरेल.

(या लेखाचे लेखक लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे, हे माजी सैन्य अधिकारी असून, आयपीएस एलसीई २०१२ परीक्षेमध्ये ते आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) साठी पात्र झालेले आहेत. सध्या ते संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.)